Monday, March 23, 2020

गालबोट

(सहज तिच्या हातावरच्या मेहंदी कडे लक्ष गेले, आणि संवाद सुरू झाला.. )

: नविन लग्न ?
: नाही जुनेच
: किती वर्ष ? 
: ३ वर्षे..
: मग कधी भांडण ?
: शिगेला पोचेपर्यंत.. 
: आणि प्रेम ? 
: रती - मदनाला सुद्धा लाजवेल इतके घट्ट आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून निघणाऱ्या वेदा इतके पवित्र.. 
: तरीही शिगेला पोचणारे भांडण, असे का ?
: गालबोट नको का ? 

(संमत्तीपूर्ण एकच हशा.. )

Saturday, April 1, 2017

भांडा सौख्यभरे !!

"हॅलो"
"हॅलो ताई"
"हो गं पूर्वा, बोल."
"मला तुमच्या भावासोबत नाही राहायचे. मला काडीमोड हवा आहे."
"हो हो, पण अगं झाले तरी काय ? काही सांगशील का ?"
"काय व्हायचे ? नेहमीचेच ! भांडण ! कारण लागतं का ह्यांना भांडायला ? आणि पुन्हा माझ्यावरच येतं सगळं खापर फुटायला. मीच सुरु करते ना भांडण... ताई तुम्ही काहीही म्हणा मला काडीमोड हवाय."
"बरं, बरं  मी बोलू का पंकजशी ? "
"काही नको, पुन्हा तिखट मीठ लावून माझ्याच नावावर फोडणी बसते."
"बरं ... राहिलं ! नाही विचारत आणि तुला सुद्धा भांडणाचे कारण नाही विचारत. पण पूर्वा, तू जे काही बोलत आहेस ना त्यात कितीसं सत्य आहे हे तरी तू तपासून पहिले आहेस का ?
नाही म्हणजे, तू आधी शांत हो, चूक तुझी का त्याची हे पण नको लक्षात घेऊ. पण तुम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकणार आहेत का ?"
"हो मी राहीन. तुम्ही आहात ना माझ्या पाठीशी. आहात ना ताई ?"
" हो गं  बाई, मी आहे. मी कुठे जाते तुला एकटीला सोडून."
"मग तर झालं , माझा निर्णय पक्का आहे. मला काडीमोड हवाय. मी राहू शकते पंकजशिवाय. तशीही माझी कोणतीच कामे त्यांच्यामुळे अडत नाहीत. तितकी तरी मी समर्थ आहे."
"बरं  कळलं ! पण मी आत्ताच तुझ्या निर्णयाला संमत्ती देणार नाही. माझी एक अट आहे."
"मला तुमच्या सर्व अटी  मान्य आहेत. नेहमीच्या त्रासातून तरी मुक्त होईन मी."
"अगं  माझी अट तरी ऐक... माझी अट अशी आहे कि हेच वाक्य, 'पंकज आणि तू एकमेकांशिवाय राहू शकता ', हे मला तुझ्या तोंडाने ऐकायचे आहे आणि आत्ता नाही उद्या. मी फोन करेन तेव्हा मला हेच वाक्य इतक्याच ताठरतेने ऐकवायचे. तेव्हा मी तुझे म्हणणे मान्य कारेन. "

( फोन  ठेवल्याचा  आवाज )

"हूश्श्...!!"
"काय गं ? कोण होते फोन वर ?"
"आहो काही नाही हो, आपली पूर्वा.."
"काय म्हणते ? कसं चाललंय त्या दोघांचं ?"
"काही नाही थोडीशी अशांत होती."
"म्हणजे पुन्हा भांडण की काय ? काय म्हणावे त्या दोघांना ? किती भांडणं करतात !"
"आहो असं काय म्हणता ? कुठे भांडण ? थोडेसे मतभेद झालेत बाकी काही नाही !"
"हो. .. मी ऐकले बरें थोडे फार! म्हणे मतभेद झाले..., काडीमोड ची भाषा का वापरात होते मग ते?"
"काही नाही हो ... टोकाला जाण्याची दोघांची सवय. आपला पंकज पण काही कमी नाहीये ह्या बाबतीत."
"उगीच पंकज ला दोष देऊ नकोस अनु. पूर्वा बायको आहे त्याची. तिने नको का समजावून घ्यायला ? "
"हो? का पंकज ने घेतले तर काय हरकत आहे ?"
"पण पंकज कसा समजावून घेणार? समजावून घेण्याचे काम तरबायकोचे असते. "
"हे बरे आहे तुमचे.. . पंकज आपले नाव घेऊन जन्माला आला म्हणून तो आपला आणि पूर्वा ? ती आपल्या घराण्यात जन्माला आली नाही म्हणून ती परकी ? आहो ती तर आता आपल्याच घराण्याची झाली आहे ना ?" 
"अगं तसं नाही म्हणायचंय मला, पण काहीही म्हण मला काही ह्यांची भांडण पटत नाहीत बघ."
"तसं नाही हो, अजून लहान आहेत दोघे. सोबत राहतात, मतभेद होतात.
आणि हे बघा, काहीहि म्हंटलं तरी ते एकमेकांना सोडून एक क्षण राहू शकत नाही. मला खात्री आहे ह्याची."
"हो तुला खूप खात्री असेल गं, पण हे त्यांना कळायला नको का ?"
" कळतं  हो, त्यांना सुद्धा कळतं. एकमेकांना बोलताना वाट्टेल ते बोलतात. भांडताना समोर कोण आहे ह्याचा विचार पण करत नाहीत. पण..."
"अगं पण मग भांडणं का करावीत ?"
"होतात मतभेद, मग एकमेकांच म्हणणं कसं  बरोबर आहे हे पटवून देता देता समोर वैरी उभा आहे हा अविर्भाव उत्पन्न होतो... 
आणि का हो ? आपण पण असेच भांडायचो ना अमोघ ? पण आत्ता वेळ तरी असतो का भांडायला ? आयुष्य जसं जसं समोर नेतं माणसाला तसं तसं सुटत गेलेल्या आयुष्याची किंमत कळते.
आणि हो अमोघ, त्यांचं  हे  भांडण आजचे नाहीये. आता किती महिने झाले आहेत आपण नेहमी त्यांचे भांडण ऐकत आलो आहोत. 
पण खरं सांगू, त्यांची भांडणं हे प्रेमापेक्षा दृढ आहेत. एक माहित आहे ? माणूस जितका मनातून प्रेम करत नाही, त्याहून कयेक पटीने वैर निभावतो.
आणि इथे ह्या दोघांना वाटतं कि आपण आपल्या वैऱ्याबरोबरच भांडत आहोत. पण वेड्यांना हे कळत  नाहीये, की ते दोघे एकाच बाजूला आहेत. त्यांचे भांडण म्हणजे, एखाद्या तलवारीचे तिच्याच सोबती ढालीसोबत चाललेले भांडण आहे. 
ह्या ढाल-तलवारी मध्ये ढालीने समजुतीने घ्यायला हवे आणि ही ढाल तेच विसरते. ती हे विसरते की तलवार ही वार करण्यासाठी जन्माला आली आहे आणि ढालीने कायम संरक्षण केले पाहिजे. हे नाते जिवंत ठेवण्यासाठी ढालीची कामगिरी प्रथमदर्शनी असायला हवी. 
आणि अमोघ ह्यात ढाल म्हणजे दुसरे कोणी नाही तर पंकज आहे आणि पूर्वा ही तलवार आहे. पण तिची धार कमी करण्याचे काम हे ढालीचेच असते.
हे कधी कळणार आहे पंकजला ? "
"तू पण ना अनू, कधी संदर्भासह स्पष्टीकरण द्यायचे नकोस सोडू. पण हो, तुझे म्हणणे अगदी पटले मला. उद्या बोलू त्या दोघांना. चल झोप बघू आता."

ट्रींग ... ट्रींग ...
"हॅलो"
"हॅलो पूर्वा "
"हॅलो ताई, बोला "
"काय चाललंय कुठे पर्यंत आले मग तुमचे भांडण ? काडीमोड हवाय ना ?"
"तुम्ही पण का हो ताई, माझीच खिल्ली उडवत आहात. जणू काही मी एकटीच भडकले होते काल ?"
"नाही गं बाई माझी, तुझी चेष्टा करत होते. म्हंटले होते ना मी की तू मला आज ते वाक्य नाही म्हणू शकणार. बरे पंकज आहे का तिकडे ? "
"हो आहेत, देते हं "

"हॅलो ताई"
"काय चाललंय? "
"काही नाही गं ताई, कामावर जाण्याची तयारी. आणि हो कालच्या प्रकरणाची तू नकोस काळजी करू.  मी आहे ना. काल थोडी चिडचिड झाली होती बाकी काही नाही."

"अनू, पंकज आहे का ग फोने वर ? मला जरा दे बरे, बोलायचे आहे त्याच्याशी काही महत्वाचे.. "
"हो, घ्या"

"हॅलो पंकज, कसा आहेस रे ?"
"हॅलो दादा, मजेत आहे तुम्हीच सांगा"
"काही नाही रे बाबा, काल तुमचे भांडण झाले आणि मला एक व्याख्यान ऐकायला मिळाले तुझ्या ताईकडून. पण हो ती जे काही म्हणाली ना ते सगळे अगदी पटले बरे मला.
पंकज तुला एक सांगतो.. पुरुष म्हणजे ढाल आणि  स्त्री म्हणजे तलवार असते आणि ढाळीचे काम कायम दोघांमधील नाते जपण्याचे असते. मी ह्यातून खूप काही शिकलो बघ काल.
पंकज, पूर्वाचा जन्मच तलवारीचे प्रतीक घेऊन झालेला आहे. ती जेव्हा वार करेल तेव्हा तूला ढाल बनून तो वार झेलायचा असतो. अगदी निर्भय, निर्भीड पणे.
तू वार चुकवलास, तर तलवार अजून जास्त आवेशाने वार करते, तिच्यात नक्कीच तितकी ताकद असते की तो आवेश पराकोटीला गेला तर ढालीला चिरून ती त्या ढालीच्या मागे असलेल्या सुरक्षित नात्याला ठार करू शकते.
म्हणून सांगतो, खंबीर उभा राहा तलावारीचा वार स्वीकारायला. कितीही वार केला तरी तू चुकवतच नाहीस म्हंटल्यावर तिचा आवेग कमी होईल आणि सतत वार केल्याने तिची धार पण कमी होईल. ती स्वतःहून शरणगती स्वीकारेल. कळतंय का ?"
"खरंय दादा तुमचं, माझ्या हे कधीच लक्षात आले नसते."
"माझे म्हणणे लक्षात ठेव कायम. कारण ढाल-तलवारीचा आवाज रणांगणात शत्रूसोबत बरोबरीने दोन हात करतानाच छान वाटतो. एकमेकांविरुद्ध शत्रुत्व पत्कारून एकमेकांवर वार करताना नाही.
बरं, पूर्वाला दे फोन, ताईला काही बोलायचे आहे तिच्याशी. "
"हो देतो. पूर्वा हा घे फोन ताईला बोलायचे आहे."

"हॅलो ताई, "
"पूर्वा, आता नीट राहायचं हं. आणि हो भांडणं भरपूर करा पण प्रेमाने. 'भांडा सौख्यभरे!!' "
"तुम्ही पण ना ताई... काही तरीच तुमचं."
"चल आता ठेवते बरे फोन. लागा कामाला."

( फोन  ठेवल्याचा  आवाज )

"हूश्श् .. खरंच खूप लहान आहेत हो दोघे अजून. समजेल त्यांना पण हळू हळू. "
"पण काहीही म्हण हो अनू, तू खूप समजून घेतेस. आपल्यातली ढाल खऱ्या अर्थाने तूच बनली आहेस."
"काही तरीच काय हे तुमचं ..."
"अगं, खरंच बोलतोय."
"तुम्ही पण ना अमोघ... "

Saturday, July 4, 2015

उंदीर...

मनाच्या गाभार्यात बेशुद्ध पडलेला उंदीर
आज चुळबूळ करत आहे..
त्याच्या शरिराला ऊब मिळाली आहे ना..
गाभारा आज तापला आहे..
भयंकर गरम..
हे स्वच्छ मन आज पुन्हा उध्वस्त होणार..
कितीदा आवरा, सावरा..
पण हा उंदीर..
हा काही मनाला स्वच्छ राहू देत नाही,
गभारा तापतो..
ह्याला ऊब मिळते..
अचानक पुन्हा जिवंत होतो..
मनात थैमान मांडायला सुसज्ज,
मनातल्या चांगल्या विचारांच्या चिंध्या चिंध्या करतो
पण मार खाल्लेला बिचारा उंदीर.. 
हे उद्धवस्त झालेलं आणि विस्कटलेलं मन उराशी देऊन पुन्हा निपचीत गाभार्याच्या एका कोपऱ्यात पडून रहातो...
पुन्हा उद्याच्या थैमानासाठी शक्ती एकवटण्यासाठी... 

Sunday, July 14, 2013

खरच का इतके वेगळे आहोत आपण........

डोळ्यात पाणी दाटले होते.
लागले  नव्हते  शरीराला,
पण मनाला घाव बसला,
का इतके परके आहोत आपण
का कोणीच नाही आपला...

खरच आज जगाची नियती कळली
जेव्हा गरज आपल्याला तेव्हा
कोणीच नसतो आपला
पण जेव्हा कोणाला आपली गरज तेव्हा…
तेव्हा का कळत नाही 'हा कोणीच नाही आपला'
खरच का इतके वेगळे आहोत आपण........

Wednesday, September 19, 2012

विवाह-प्रेम आणि नाते

आजचा विषय जरा वेगळाच आहे ना ? माहित आहे मला तुम्ही वाचून थोडे गोंधळाल... खरेच विषय थोडा हटकेच आहे "विवाह प्रेम आणि नाते..."
होय विवाह दोन प्रकारचे असतात. एक प्रेम-विवाह, आणि एक घरच्यांनी ठरवून दिलेल्या जोडीदारासोबत घडून आलेला पारंपारिक पद्धतीचा विवाह. आता ह्यात काय? बरोबर आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. पण थांबा ही तर सुरुवात आहे.
बरे आता एक सांगा बरे प्रेम म्हणजे काय? हं ... थोडेसे अवघड आहे ना? तरी प्रेम म्हणजे जिव्हाळा, माया, एकमेकांबद्दल वाटणारी आपुलकी.. नाना प्रकारे सांगण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो.
बरे आता नाते म्हणजे काय सांगता येईल ?
...... नही ना? थोडेसे जास्तच कठीण वाटते ना? आहेचय हे थोडे कठिण.
आपण नेहमी म्हणतो , "लग्न झाले कि प्रेम वाढते आणि ह्यातून नंदनवन फुलावे असे सुरेख नाते दोन जीवांमध्ये तयार होते."
पण मला सांगा असे आपल्या किती जणांच्या आयुष्यात घडले आहे?

आज थोडा विचार करण्याची वेळ वाटली मला म्हणूनच हा विषय.
लग्न शब्द ऐकला तर काहीना स्वतःचा लग्न सोहळा आठवेल. काहीना आपल्या मुलांच्या लग्नातली  धावपळ  डोळ्यासमोर येईल, काहीना आपण कसे पळून जाऊन लग्न केले ह्या भूतकाळच्या कडू-गोड आठवणीनी अंगावर काटा  उभा राहील.. आणि काही आपले लग्न होणार म्हणून विचारात रममाण होतील.

ह्या लग्न करणाऱ्या आणि लग्नाला मानणाऱ्या लोकांचा प्रांत दोन भागात विभागलेला आहे. तो म्हणजे Love Marriage आणि Arrange Marriage. ह्या दोन लोकांमध्ये नेहमी तू-तू-मी-मी चालते. Love  marriage मानणाऱ्या लोकांना नेहमी वाटते अरे काही लोक कसे एका अनोळखी माणसा सोबत राहतात. आणि Arrange marriage मानणाऱ्या लोकांना प्रेम-विवाह तुच्छ वाटतो.
काय कारण आहे बरे ह्याच्यात असे दोन भाग झाले... त्याला कारण आहे ते म्हणजे लग्न नंतर होणारे मतभेद, भांडणे. आणि परिणामी संसाराची होणारी विटंबना. "एका अनोळखी माणसासोबत लग्न केल्याने असेच होणार", किवा "मोठ्यांचे न एकता स्वतःचेच खरे करणार तर असेच होणार" म्हणून  त्यांची  अवहेलना होते. पण का हो कधी हा विचार केला आहे का, की जशी भांडणे अनोळखी लोकांमध्ये होतात तशीच ओळखीच्यांमध्ये सुद्धा होतात. त्याला कारणे काय आहेत महित आहेत?

चला तर आज आपण टीका करण्यापेक्षा थोडा वेळ कारणे शोधूया...
लग्न म्हणजे एक बंधन हे सात जन्म पलीकडच्या पवित्र नात्यांच्या आशीर्वादाने बांध्याला जाते. इतके पवित्र बंधन आपण  मंडपात शुल्लक गोष्टींमुळे खराब करून घेतो आणि ती सल मनात धरून संसाराची पहिली पायरी चढल्या जाते. मनातल्या प्रेमाच्या झऱ्यावर कधी त्या छोट्याश्या सलीचे शेवाळ तयार होते ते कळतच नही. आणि मग प्रेमच फुलले नही तर नंदनवन कसे तयार होणार. आणि खऱ्या अर्थाने नाते कसे तयार होणार? ह्यासाठी लक्ष्यात आले कि लगेच ह्या शेवाळाला स्वतः आधी साफ करणे गरजेचे नही काय?
बरे पण का हो प्रेम विवाह करणारी, प्रेमासाठी जीवाला जीव द्यायला लावणारी आग मनात बाळगणारी मंडळी त्यांचे काय? ते का वेगळे होण्याचा विचार करतात? अहो एक दिवस चेहरा नही पहिला तर  जीव जावा, आणि एक दिवस "इथून पुढे तुझे तोंड पहिले तर जीव देयीन" म्हणून गर्जना करताना आढळतात. त्यांच्यात एकच गोष्ट असते. अहंकार.. होय हा अहं प्रेमात आला की काश्याचे प्रेम काश्याचे लग्न काश्याचे नाते. सगळे बेचिराख. काय हरकत असते आपल्या प्रेमासाठी थोडी माघार प्रत्तेकाने घेतली तर... अर्थातच हि गोष्ट दोन्ही जीवांनी तितक्याच तोला-मोलाने सांभाळायला हवी.

आज च्या युगात आपण लग्न हि एक गरज मानतो,.. आणि मग गरज कश्या प्रकारात समोर येईल हे  नही. परिणामी गरज भागते पण समाधान मिळत नही.  खरे तर लग्न हे मनावरचे संस्कार आहेत. ते प्रत्तेकाने स्वतः सोबत उपजतच आणले असतात. ते संस्कार मनावर घडवण्याचा उशीर असतो ते काम तर प्रत्तेकाला स्वतःलाच करावे लागणार आहे. आणि हे जेव्हा होयील तेव्हा नक्की म्हणता येईल की "लग्न झाले कि प्रेम वाढते आणि ह्यातून नंदनवन फुलावे असे सुरेख नाते दोन जीवांमध्ये तयार होते."

 कराल थोडासा विचार ?

Saturday, June 23, 2012

दोन मित्र, अगदी जीवा भावाचे ...

दोन मित्र, अगदी जीवा भावाचे ...
एकाचे नाव शाम तर दुसरा राकेश..
जीव इतका दोघांचा एकमेकांवर की शाळेला जाताना, घरी येताना, बाहेर जाताना नेहमी सोबत...
असे वाटावे  पाहणाऱ्याला की जणू काही सक्खे जुळे भाऊच...

दोघे एकाच वर्गात शिकायचे...
शिकता शिकता मोठे झाले, पुढच्या शिक्षणासाठी स्पर्धा सुरु झाली..
दुर्दैवाने दोघांना शिक्षणासाठी वेगळे व्हावे लागले, दोघे वेगवेगळ्या गावात, करमेना एकमेकांवाचून...
पण करणार काय, स्वप्ने होती.. ती तर पूर्ण करायची होती... 
काही महिने दर आठवड्याला भेटणे... मग काय दोन दोन दिवस गप्पा, हुंदडणे...
मग अभ्यासाचा व्याप इतका वाढला... की दर आठवड्यांची भेट महिन्यांवर व्हायला लागली...
महिन्यांनी भेटल्यावर काय काय गंमती सांगू ह्यातच दोन दिवस जायचे...

कालांतराने महिन्यांनी भेट होईना .. नौकरी चे tension, शिक्षणाचे चीज व्हावे म्हणून काम शोधणे गरजेचे..
मग कामाचा व्याप.. तरीही आठवणीने सुट्टी काढून 3-4 महिन्यांनी भेट..
वय झाले. घरच्यांना सुनमुख पहाण्याची हौस. नौकरी मिळाली... लगेच छोकरी ही मिळाली... 
एकमेकांच्या लग्नात धमाल उडवली... पुन्हा भेटण्याचे वचन घेऊन निघाले शूर-वीर लढायला, आपआपली  संसाराची रणांगणे जिंकायला...


पुन्हा  काही दिवसांनी भेटण्याचा योग तर पहा तो... दोघे आले होते एकाच गावात...
कुटुंबासहित सुट्टी घालवायला... भेटले रस्त्यात...
अचंबित झाले... " वाढलेल्या " कुटुंबाची ओळख करून देत एकमेकांना ओळखण्याचा कार्यक्रम...
खूप दिवसांनी भेट आणि त्यात वया नुसार झालेला बदल...
पुन्हा तेच भेटण्याचे वचन आणि  घेतलेला निरोप..

......पण आज खूप दिवस झाले शाम आणि राकेश भेटले नव्हते ... किती वर्ष झाली त्यांच्या भेटीला,  हे शामला पण आठवत नव्हते..
पण राकेशचा तो तजेलदार चेहरा पाहून शाम पेपर मधली बातमी वाचत होता..
                 " तीव्र हृदय विकाराने डॉ राकेश जाधव यांचे आज पाहटे निधन... " पुढे काही शाम ला वाचवेना, शामने पेपर बाजूला केला आणि सुरकुत्या पडलेल्या आपल्या गालावरचे ओघळणारे अश्रू टिपले.. 

Monday, May 21, 2012

काय सापडलं ?


आज मनाचा वेध घेतला... माहित आहे त्यात काय सापडलं ?
कोरा करकरीत पणा.. खरच आज मन खूप कोरं आहे. पण त्यावर सुद्धा अदृश्य अश्या खूप पाऊलखुणा आहेत.
काही मानवाच्या तर काही दानवांच्या..