"बाबा..."
आवाजाच्या दिशेने समीर ने पहिले. एक मुलगी त्याच्या गेट मध्ये उभी होती. मद्ध्यम बांधा, रंगाने उजळ, नाकी डोळी नीटस, काहीशी २०-२२ वर्ष्य वयोर्मर्यादा, पोशाख जरा विलायतीच पण नीट असा.. समीर दोन सेकंद पाहतच राहिला.
ओळख पटते का म्हणून समीर विचारात गुंतला, पण वयानुसार त्याला लक्षात येत नव्हते. समीर ही आता वयस्कर झाला होता, असेल ५०-६० च्या हद्दीत. पण अजूनही तसाच काटक, उंच, गोरा, आणि चेहऱ्यावर स्मितहास्य पण त्यावरही एक पुसटशी काही तरी गमावल्याची छाया पण तरीही सर्वकाही मिळवल्याचा नुसताच आभास.
समीर ने थोडा विचार करून विचारलेच, "कोण तू बाळा? काय तू मला ओळखतेस का ?".
"हो ! मी समीरा, लंडन हून आले",
" कोण हवंय तुला ? तू बाबा म्हणालीस, मी समजलो नाही "
समीर तिच्या साश्रू नयनांकडे पाहत ओळखण्याचा प्रयत्न करत होता. समीरा ने आपल्या पर्स मधून एक फोटो काढला आणि समीर पुढे धरत ती म्हणाली, "ह्यांच्या मूळेच मी तुम्हाला बाबा म्हणाले."
समीरने तो फोटो पहिला आणि अचानक डोळ्यात पाणी तरळले, ते सारं त्याला आठवत होते, जणू काही आताच घडलाय. काळाची चक्र अशी काही जोरात पळत होती की तो तिथेच थबकून विचारांच्या जगात पोचला.
कॉलेजचा तो पहिला दिवस, सर वर्गात introduction घेत होते. अचानक एक आवाज " May I come in sir?"
समीर त्या मुली कडे पाहतच राहिला. मध्यम उंचीची, सावळी, अगदी सुंदर नाही पण नीटस दिसणारी ती मुलगी समीरला पाहता क्षणीच खूप आवडली.
बरेच दिवस समीर तिच्याशी बोलण्याचा विचार करत तिच्या पर्यंत जायचा तर खरा, पण घाबरून सरळ निघून जायचा. एव्हाना समीरने तिची पूर्ण कुंडली गोळा केली होती, फक्त उशीर होता तो तिला बोलण्याचा.
एक दिवस रोजच्या सारखा कॉलेज सुटल्यावर घरी जात असताना शेजारी कोणी तरी चालत आहे असा भास झाला म्हणून समीर ने पहिले तर तो पाहतच राहिला, चक्क चक्क राधिका त्याच्या कडे पाहत स्मितहास्य करत होती.
"Hi Im Radhika.".
"Hello, Sameer".
"आजचा तुझा seminar खूपच छान झाला."
"Thank you, तुझा पण topic खूप छान होता, in fact तू मांडला पण छान होतास ".
"Thank you.."
"..................",
"........................"
थोडा वेळ दोन्ही कडे शांतता. आता पुढे काय बोलायचे, हे कोणालाच सुचेना. समीर ला तसेही आज आकाश
ठेंगणे झाले होते. ज्या मुलीला बोलण्याच्या प्रयत्नात त्याने सहा महिने घालवले ती मुलगी आज त्याच्याशी स्वतःहून बोलत होती.
"काय मग अभ्यास कसा चालू आहे ? "
"काही नाही रे, असाच... मला अभ्यासाचा खूप कंटाळा आहे."
"हो हो, म्हणूनच नेहमी छान मार्क्स असतात ग तुला टेस्ट मध्ये. "
"ते तर असच, कदाचित टीचर नीट पेपर चेक करत नाहीत म्हणूनच..."
"हो का? पण पाहता पाहता हे सेमिस्टर संपलं."
"हो नं. चल मी निघते, माझी रूम ह्या रस्त्याला आहे. भेटू पुन्हा उद्या. "
"Ok, bye."
समीर त्याच्या रूम वर आला. आज त्याला करमत नव्हते. गच्चीवर तो आज बराच वेळ बसला होता, तिला आठवत.... तिचा चेहरा त्याच्या डोळ्यां समोरून जातच नव्हता. त्याला ती खरच खूप आवडली होती. तो स्वतःशीच हसत होता.
पाहता पाहता परीक्षा झाल्या. सुट्ट्या संपल्या. ह्या सुट्ट्या मधे समीरला घरी मुळी करमतच नव्हते. त्याने घरून येतानाच ठरवल, 'ह्या वर्षी राधिकाला
मनातली गोष्ट बोलूनच दाखवायची. तिच्या पण मनात आपल्या बद्दल कही चालला असेल
तर ठीकच आहे.'
समीर पहिल्या दिवशी राधिकाला बोलण्यासाठी वर्ग सुटल्यावर बाहेरच थांबला.
" हेय, काय ग कशी झाली सुट्टी?"
"काही नहीं! खुप कंटाळा आला ह्या वेळेस घरी, कधी एकदाची सुट्टी संपते असं झालं होतं. "
"मला पण तसच झालं होतं,...."
"का रे?"
आपण कुठे पकडल्या जातो की काय हे वाटून समीर ने वेळ पळवून नेली, "काही नाही गं चल, मला जरा काम आहे मी तुला उद्या बोलेन ." समीर तिला बोलूच शकला नाही, पण त्याने ठरवले काहीही करून लवकरात लवकर बोलूनच टाकायचे.
असेच काही दिवस हळू हळू समीर ने राधिकाशी बोलणे वाढवले, एक दिवस मनाचा हिय्या करून त्याने राधिकाला गाठलेच,
"राधिका, कॉलेज सुटल्यावर जरा बोलायचे आहे तुझ्याशी, आज प्लीज सोबत जाऊया."
राधिका, "हं". कॉलेज सुटल्यावर समीर राधिका सोबत निघाला.
"राधिका, खूप दिवसा पासून तुला एक गोष्ट सांगायची होती, प्लीज मला चुकीचा समजू नकोस, आणि राग मानू नकोस."
".......", राधिका ने एकवार समीरच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पहिले.
"कसं सांगाव तेच कळत नाहीये, खूप दिवस तुला काय वाटेल हाच विचार करत होतो, पण आज राहवलेच नाही."
"..........."
"प्लीज अशी शांत नकोस बसू ग, काही तरी बोल न.."
"अरे तू सांगणार आहेस ना, मग मी काय बोलू?"
"तुला राग तर येणार नाही ना?"
"आता तू काय सांगणार आहेस त्यावर आहे बघ ते."
"ये प्लीज रागवू नकोस, प्लीज"
"ठीक आहे, आता बोल. मला पण आता सस्पेन्स सहन होत नाहीये"
"राधिका, अं... अं.... राधिका,........ मला तू आवडतेस."
राधिका तिथेच थबकली होती हे ऐकून, कारण तिला पण समीर कॉलेजच्या पहिल्या दिवशीपासूनच खूप आवडला होता. पहिल्या दिवशी राधिका जेव्हा वर्गात पोचली होती तेव्हा पहिल्या बेंचवर बसलेल्या मुलाकडे पाहून तिच्या मनात फुलपाखर उडाली होती. उंच, रंगाने गोरा, पाणीदार डोळे, चेहऱ्यावर मिश्कील हसू , त्या मुलाकडे पाहून कोणीही मुलगी भाळल्याशिवाय राहणार नव्हती. आणि आज तोच मुलगा... समीर, तिच्या प्रेमात पडला होता. तिला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता.
"अगं, बोल न काही तरी, राग आला का तुला ?" राधिकाच्या मक्ख मूर्ती कडे पाहून समीर काकुळतीला आला, त्याला तिची मैत्री तोडायची नव्हती आणि त्याचसाठी तो आजपर्यंत तिला ह्या विषयी बोलत नव्हता.
"तू...... तू खरच बोलत आहेस?"
"का? जीव टांगणीवर टाकून कोणी खोटं बोलेल का?"
"म...म... मला पण तुला एक गोष्ट सांगायची होती."
"काय?"
"मला .... पण.... तू.... खूप आवडतोस.... पण सांगायची हिम्मतच होत नव्हती."
आता तर समीरच्या आनंदाला पारावर उरला नव्हता, त्याला आत्ता तिला मिठीत घ्यावसं वाटत होता, पण तो नुसताच तिच्याकडे कटाक्ष टाकत हसत होता.
वर्षा मागून वर्ष जात होती, शेवटच सेमिस्टर आलं. इथेच भविष्य ठरणार होता. राधिका-समीर ने ठरवलं, 'भरपूर अभ्यास करायचा, छान करियर करायचं, आणि सोबतच हे आयुष्य पुरेपूर जगायचं'. वर्ष संपलं, कॉलेज संपल, दोघांना छान नौकरी मिळाली. वेळ काढून बाहेर हिंडणं-फिरणं सुरु झाल.
एक दिवस समीर ने राधिकाला शहरापासून दूर नेलं, एकांतात..
"समीर, आता तर आपण एकमेकांना छान ओळखतो, नाही का?"
"राधिका, असं का बोलत आहेस?, काही प्रोब्लेम आहे का?"
"समीर,... माझ्या घरचे माझ्या लग्नाचा विचार करत आहेत, आता आपल्याला भेटून सुद्धा चार वर्ष होत आली, ह्याच्या पुढचा विचार..., म्हणजे..... "
"मला कळतंय ग तुला काय म्हणायचं ते, तुला काय वाटलं? मी आज तुला इथे, ह्या शांत, एकांत जागेत उगाच घेऊन आलो आहे का? मला तुला ह्याच विषयावर बोलायचं होतं. विचार करत होतो, सुरुवात कोठून करावी."
समीर ने एक निःश्वास टाकला, राधिका त्याचा जवळच बसली होती. ह्या अश्या नाजूक विषयात राधिका त्याच्या दूर, त्याला मुळीच अवडल नसत, समीर ने राधिकाच्या भोवती आपला हात टाकला आणि तिला हळूच आपल्या मिठीत घेतले.
"राधिका, ....",
"हुं?"
"माझ्या घरी मी आपल्या नात्याबद्दल सांगितलं आहे, माझ्या घरच्यांची ह्यावर काहीच हरकत नाहीये. तू तुझ्या घरच्यांना ह्याची कल्पना तर दिली आहेस ना?"
"अं.. नाही समीर, मी अजून तरी काही बोलली नाही तसं. पण आईला सांगितला आहे की माझा एक खूप चांगला मित्र आहे म्हणून, पण तसं स्पष्ट सांगायची हिम्मतच होत नाही."
"अगं, पण असं म्हणून कसं चालेल वेडे? बरं जाऊ दे, उद्या रविवार आहे. माझ्या वडिलांना घेऊन मी येईन तुझ्या घरी, फक्त घरी मी येत आहे एव्हडी तरी कल्पना देऊन ठेव. चालेल? "
समीरचा तो समजूतदारपणा राधिकाला काही नवीन नव्हता, पण आज तिला त्याच्या ह्या स्वभावाला पाहून खूप खूप रडावस वाटत होता. ती समीरला अजूनच बिलगली होती. त्याच्या मिठीत जणू तिचा नवीन जन्मच होणार होता.
सांगितल्याप्रमाणे समीर वडिलांसोबत राधिकाच्या घरी पोचला. दार उघडण्यासाठी तिचे वडीलच आले होते. समीरने त्यांना पाहताच हात जोडून नमस्कार केला, "नमस्कार, मी समीर. राधिकाचा मित्र."
"नमस्कार. या या, आत या ना." सुरेशरावांनी समीर आणि त्याच्या वडिलांना बसण्यास सांगितले.
"राधिका, बेटा बघ तुझा मित्र आला आहे. " एव्हडे बोलून सुरेशराव समीरच्या समोर खुर्चीवर बसले.
"हे माझे वडील", समीरने वडिलांची ओळख करून देत म्हंटले.
"नमस्कार, मी कुमार जाधव. समीरचा पिता."
"मी सुरेश देशपांडे., कसं काय येणं केलत अचानक?"
"नाही जरा तुमच्याशीच काम होतं. काय असतं सुरेशराव, काही गोष्टी समोरासमोर बोलणेच चांगले असते, नाही का?"
"जाधवसाहेब, मी काही... समजलो नाही बघा!"
"त्याचं असं आहे, हल्ली आपला जमाना नाही राहिला. आता मुलं बाहेर राहतात, शिकतात. एकमेकासोबत खेळतात, हसतात, बोलतात. हसण्या हसण्यात कधी एकमेकांची मन जुळतात ते कळतच नाही."
"जाधवसाहेब, काय बोलायचं ते स्पष्ट बोलाल तर बरं होईल" जरा गोधाळून सुरेशराव बोलले. समीर एकदा त्या दोघांकडे, तर एकदा कोपऱ्यात उभ्या राधिकाकडे पाहत होता.
"स्पष्टच सांगायचं झाल तर, माझा समीर आणि तुमची राधिका दोघे एकमेकांवर प्रेम करतात. आता प्रेम होणे हे स्वाभाविक आहे सुरेशराव, त्यात कोणाचेच काही चालत नाही. म्हणून ह्या नात्याला, अजून स्पष्ट रूप द्याव ह्या विचाराने मी इथे आलो होतो. म्हणजे समीर आणि राधिकाच्या लग्नच....."
थोडावेळ सगळी कडे निरंव शांतता पसरली. सुरेशरावांनी एकवार आपल्या मुलीकेडे पहिले. त्यांना ह्याचा राग नव्हता पण.....
"हे पहा जाधवसाहेब, मी प्रेमाच्या विरोधात नाही. मलाही मान्य आहे की ह्यावर कोणाचाच जोर नसतो चालत. पण.... पण मी मजबूर आहे."
"कसली मजबुरी?"
"जाधवसाहेब, राधिका माझी मुलगी, आणि राकेश तिचा छोटा भाऊ. दोघांमध्ये फक्त वर्षाच अंतर आहे. अजून तीन चार वर्षांनी त्याच पण लग्न होईल. आणि मला असं नाही म्हणायचं, पण तुम्ही जाधव, आम्ही पडतो देशपांडे आणि राधिका ने जर ह्या घराण्यात लग्न केल तर उद्या राकेशसाठी मुलगी मिळण कठीण होईल. आणि मुलीबद्दल बोलणे ऐकायचे समाजात... खूप त्रास होतो साहेब."
"अहो सुरेशराव, तुम्ही कोणत्या युगात राहत आहात?"
"मान्य आहे मला साहेब. पण मी मुलीचा पिता आहे.आणि त्यातल्या त्यात माझा मुलगा पण लहान आहे. कोणीच पिता आपल्या मुलीबद्दल समाजात वाईट नाही ऐकून घेऊ शकत. तसच मुलासाठी पण चांगली मुलगी मिळावी हीच अपेक्षा असते बापाची. खरच तुम्ही खूप चांगले आहात. समीर पण गुणी मुलगा आहे. पण समाजाच्या बेड्यांनी मी जखडलो गेलो आहे."
"सुरेशराव...?"
"माफ करा मला जाधवसाहेब. मी आपल्या मुलांचं मन दुखावत आहे. पण आपली मुलं खूप समजूतदार आहेत. समीर, मला खात्री आहे तू मला समजून घेशील. हव तर तुम्ही दोघे आयुष्यभर एक चांगले मित्र म्हणून राहू शकता माझी काही हरकत नाही, पण लग्नाचे बंधन.... मी तुम्हाला परवानगी नाही देऊ शकत.."
हे ऐकून समीर च्या डोळ्यात पाणी तरळले, तो सुन्न झाला. ज्या मुलीचा तो विचार करणे सोडू शकत नव्हता, तिला आज कायमच सोडव लागणार होतं. खूप कसोशीने स्वतःला सांभाळून त्याने सुरेशरावांकडे पहिले, "काका, तुमची समस्या कळते मला. तुम्ही काळजी करू नका. माझ्यामुळे तुमच्या मुलीला किंवा तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. हे माझं वचन आहे."
राधिका हे सार मनावर दगड ठेऊन ऐकत होती. तिने समीरकडे पहिले.
"राधिका, मी नेहमी तुझ्यासाठी हजर असेल. दुःख नको करू, कदाचित आपण ह्या नात्यासाठी बनलोच नव्हतो.!, तुला केव्हाही गरज पडेल तेव्हा सांग."
"समीर...." राधिकाचा आवाज आताच राहिला.
समीरला तिची ती अवस्था पाहवत नव्हती, त्याने लगबगीने सुरेशरावांचा निरोप घेतला.
त्यानंतर समीरने राधिकाला कधीच न भेटण्याचे ठरवून दिले होते. पण कधीतरी तो सोबतच्या मित्र मैत्रिणीनकडून तिची चौकशी करत होता.
बऱ्याच दिवसांनी कळाल की राकेशचा प्रेमविवाह झाला होता. एक दिवस त्याचा मित्राकडून कळले की राधिका ला कंपनीकडून परदेशात जायची संधी मिळाली होती. पण तो तिला भेटायला गेला नव्हता, व राधिकाने सुद्धा त्याला भेटण्याचा प्रयत्न नाही केला. राधिका परदेशात गेली. त्याच्या पासून दूर. पण त्याने स्वतःला खुप सावरले.
एव्हाना तो पुण्यात चांगलाच सेटल झाला होता. जॉब पण ऐटीत चालू होता, त्याची कंपनीत एक पोझिशन होती. एक दिवस मित्राला सोडवायला म्हणून तो रेल्वे स्टेशन ला गेला असताना त्याला राधिका दिसली. आज तब्बल चार वर्षांनी तो तिला पाहत होता. पण... हे काय ? तिच्या हातात छोटी मुलगी होती. असेल दोन तीन वर्षाची. समीरने तर तिच्या लग्न विषयी ऐकले नव्हते.
समीर राधिकाच्या जवळ गेला,
"hello राधिका...!" राधिकाने त्या ओळखीच्या आवाजाकडे वळून पहिले. आणि ती स्तब्धच झाली.
"समीर..? कसा आहेस?" राधिकाच्या आवाजातले दुःख समीरला कळत होते.
"मी छान आहे. तू कशी आहेस?, आणि foreign ला गेली होतीस ना,? मला आपल्या वर्गातल्या गौरी जोशी कडून कळले होते. कधी आलीस वापस?"
"हो मी लंडन ला असते, आठ दिवस झाले आले इकडे. सुट्ट्यांसाठी आले आहे. बरं चालू आहे तिथे. आता तर पूर्ण रुळली आहे. "
"आता रेल्वे स्टेशन ला...?
"अरे आत्याकडे जात आहे मुंबईला."
"ओके. .... तुझी मुलगी खूपच छान आहे." राधिकाच्या हातातल्या त्या छोट्या मुलीकडे पाहून समीरने विषय छेडला.
"thank you."
राधिकाच्या ह्या उत्तराने समीरला हे तर कळले की ती राधीकाचीच मुलगी आहे. समीर ला ह्या गोष्टीचा त्रास होत होता. पण त्याने स्वतः ला समजून सांगितले. त्याला ह्यावर काय बोलावे तेच कळत नव्हते. त्याने एकदा राधिका कडे पहिले. ती मुलीला 'कुक गाडी' दाखवण्यात दंग होती. इतक्यात त्याची विचारांची शृंखला तोडण्यास ट्रेन आली. समीर ने पहिले, मुंबई ची ट्रेन. त्याने एकवार ट्रेन कडे तर एकवार राधिका कडे नजर टाकली.
"ओके समीर, भेटू पुन्हा, मी निघते."
तिला थांब म्हणणे ही बरोबर नाही, हे समीरला माहित होते. "ओके, नक्की भेटुत. bye, take care."
राधिकाच्या डोळ्यातल्या पाण्याकडे समीर समजून दुर्लक्ष करत तेथून निघून गेला.
त्या plat-form भेटी नंतर समीर ने राधिकाची चौकशी करण्याचे सोडूनच दिले होते. तिचे आता वेगळे विश्व आहे हे त्याने स्वतःशीच सांगितले होते. त्यानंतर समीरचे जग जणू आता एकट्याचेच होते. त्याने दुसऱ्या कोणासोबत लग्न करणे तर शक्यच नव्हते. आत्या त्याचे विश्व म्हणजे फक्त त्याची नौकरी आणि झोपायला घर. त्याने सर्वकाही मिळवले. पण आपले जीवन गमावले होते.
आणि आज तब्बल वीस वर्ष नंतर. ह्या फोटोच्या निमित्त्याने पुन्हा त्याला हे सारे आठवले होते. त्याला जणू त्याचा मनाच्या जखमेवरची खपली काढल्याचा भास झाला होता. त्याचे डोळे अनाहूतपणे पाझरत होते.
समीराच्या बोलण्याने समीर शुद्धीवर आला. "ह्यांनीच मला तुमचा पत्ता सांगितला. म्हणून मी इथे आले., ही माझी आई, राधिका. आणि मी तिची मुलगी. लंडनला होते. आई गेल्या वर्षापासून इथेच होती, मामाकडे. तिची तब्बेत ठीक नव्हती, तिला stomach-cancer झाला होता. तिथे लंडन ला कोणी तिची काळजी घेण्यास नव्हते, म्हणून मामाने तिला इथे आणले होते.... खरच खूप चांगली होती माझी आई. मी तिची सख्खी मुलगी नसूनही तिने मला हे कधीच जाणवू दिले नाही..."
"काय? म्हणजे?" समीरने तिला तोडत विचारले.
"तिने मला दत्तक घेतले होते, अनाथालयातून. ती एकटीच होती म्हणून. तीने मला मुली सारखे वाढवले Infact, मी तिची मुलगीच होते...."
"म्हणजे तिने लग्न केले नव्हते ?"
"नाही, ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करत होती. म्हणून तर तिने माझे नाव पण तुमच्या नावावर ठेवले आहे. कधीतरी मी तिला रात्री रडताना पहायचे. विचारायचे काय झालं म्हणून. पण ती माझ्या डोक्यावर हात फिरवत, 'वेळ आल्यावर सांगेन' म्हणायची. तिची गेल्या महिन्यापासून खूपच तब्बेत खराब झाली होती. डॉक्टर ने सुद्धा इलाज नाही म्हणून सांगितले. म्हणून मी तातडीने लंडन हुन आले. पंधरा दिवसांपुरी ती देवाला प्रिय झाली. जाताना इतक्या दिवसांचे लपवलेले शल्य सांगून गेली. म्हणाली, तिच्या नंतर जर ह्या जगात माझे असे कोण असेल तर ते तुम्हीच आहात, 'माझे बाबा'. आणि म्हणूनच मी तुम्हाला बाबा म्हणाले होते."
समीरला ह्या तिच्या बोलण्यावर काय म्हणावे कळत नव्हते, त्याने एकवार राधिकाच्या फोटो कडे पहिले. त्याला हुंदका आवरल्या गेला नाही. त्याने जवळ जाऊन समीराला चटकन मिठीत घेतले. समीरा त्याच्या ह्या प्रेमाने भारावून आपल्या बाबांच्या मिठीत सुखावली, आज खूप दिवसांनंतर समीर आपले लपवलेले अश्रू ढळत होता.
आज खऱ्या अर्थाने समीर ला राधीकाचे प्रेम मिळाले होते. त्याला आज सारे जीवन गमावून सुद्धा सर्व काही मिळवल्याचा खऱ्या अर्थाने भास झाला होता. कारण राधिकाने त्याला जाता जाता पित्याची पदवी जी दिली होती.